नाना शंकर शेठ

आज ३१ जुलै . एका समाजसुधारकाची पुण्यतिथी ज्यांचे नाव नेहमीच दुर्लक्षित राहिले . ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नाना शंकर शेठ . पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कार्याच्या आठवणींचा हा केलेला उजाळा . ज्यांनी स्वतःचे सर्व जीवन समाजसुधारणेसाठि अक्षरशः खर्चून टाकले होते .
📋बरेचसे जण हेच विचारतात की "नाना ?? कोण नाना? शंकर शेठ?? कधीचे?" . अगदी उदाहरण च सांगायचे झाले तर "मुंबई च्या जडण घडणीचा इतिहास" या विषयावर जो लघुपट लेझर शो द्वारे गेट वे ऑफ इंडिया ला मोठया पडद्यावर मुबाईकरांना दाखवण्यात आला मागच्या वर्षीच्या महाराष्ट्र दिना दिवशी (बहुतेक १ मे २०१७) त्यात देखील नानांच्या कार्याविषयी पुसटसा उल्लेख देखील केला गेला नव्हता . विषय मुंबई जडणघडणीचा आणि तो नानांच्या छोट्याश्या ही उल्लेखाशिवाय ? खरच कमाल आहे . यु ट्यूब वर विडिओ आवर्जून पहावा . ज्यात हिंदी अँकरिंग अमिताभ जी बच्चन आणि मराठी अँकरींग नाना पाटेकर यांनी केले होते . 
📋ते कार्याने कोणत्याही राजकीय पक्षाचे , संघाचे , दलाचे नव्हते वा कोण्या एका विशीष्ठ पंथाचे नव्हते . किंबहुना कोणते राजकीय पक्ष अजून निर्माणच झाले नव्हते . ना त्यांचे कार्य कोण्या एका जाती , पंथा चे नेतृत्व करण्यापुरते होते . 
त्यामुळे , त्यांच्या इतिहासाला , त्यांच्या नंतरच्या काळात पुढे आणून कोणालाच काही स्वतःचा फायदा कधी दिसला नसावा की काय म्हणून त्यांचे नाव नेहमी अप्रकाशित च राहिले(?) . देवच जाणे .
ज्यांना शिक्षणतज्ञ म्हटले जाई किंवा ज्यांनी निरनिराळ्या शिक्षण संस्थांची मुहूर्तमेढ तत्कालीन ब्रिटिश कालखंडात भारतीयांसाठी रोवली त्यांच्या चरित्राचा छोटासा धडा देखील शालेय पाठ्यपुस्तकात कधीही का नसावा हा अभ्यासाचाच विषय .
ज्यांनी स्वतःचे सर्व जीवन समाजसुधारणेसाठि अक्षरशः खर्चून टाकले होते . 
📋नाना वैयक्तिक धर्माचरणात वैदिक संस्कृतीचे अभिमानी ही होते ज्यांनी तत्कालीन ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या दबावामुळे पुण्यातील बंद पडणाऱ्या वेद पाठशाळांना वेळोवेळी संरक्षण ही दिले. संस्कृत वाङ्मयातील ज्ञान त्यांना लोप पावू द्यायचे नव्हते . तसेच ते अवैज्ञानिक वा अशास्त्रीय ,कालबाह्य चुकीच्या रूढींना न जुमानणारे पुरोगामी ही होते ज्यांनी सती चाल बंदी, स्त्री शिक्षणाला वेळोवेळी पुढाकार घेऊन प्रोत्साहन ही दिले, किंवा पंढरपूर मंदिरी काहींना नाकारण्यात येत असलेल्या दर्शन प्रवेशा बद्दल त्याकाळी लढा ही दिला .
📋त्यांना जेवढे अस्खलित संस्कृत येत असे तेवढेच इंग्रजी ही.
📋नानांनी कार्य केले ते देशातील समाज सुधारणा या निव्वळ हेतूने . सर्व जाती धर्म स्तरातील लोकांसाठी . जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नाना हे ज्यांना सुधारणा हव्या होत्या त्या सर्वांचेच होते.
📋जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजीचा. मराठी माणूस . ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचे मूळ गाव. आडनाव मुरकुटे .
📋त्यांना सार्वजनिक कार्याची आवड होती, विविध उद्योगधंदे असणारी शाळा मुंबईत असावी , देशात देशी वकील , देशी डॉक्टर , देशी चित्रकार, शिल्पकार होण्यास काय हरकत आहे असा विचार नानांना येत असे . त्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवनाच्या प्रमुख क्षेत्रांत सक्रिय सहभाग घेतला. मुंबई शहरातील अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला ,ज्यामध्ये “बॉम्बे असोसिएशन”,“बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी”,"एल्फिस्टन स्कुल" , "डेविड ससून इंडस्ट्रीअल अँड रिफॉर्मेटरी इन्स्टिट्यूट" , “एल्‌फिन्स्टन कॉलेज”,“ग्रँट मेडिकल कॉलेज”,“स्टुडंट्‌स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी”, "लॉ कॉलेज", जमशेटजी जिजीभाय यांच्या साहाय्याने "सर जे जे स्कुल ऑफ आर्ट", महाराष्ट्रभर शिक्षण प्रसारासाठी "बोर्ड ऑफ एज्युकेशन" ची स्थापना यांसारख्या सामाजिक , शैक्षणिक, कला,वैद्यकिय ,कायदा संदर्भातील संस्थांचा समावेश होता.
📋विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठ आकाराला येण्यामागे ही नाना शंकरशेठ यांची दुरदृष्टी होती.  
१८५७ साली मुंबई युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. ती होऊन १८६२ साली मार्च महिन्यात ६ विद्यार्थ्यांची बी.ए. ची पहिली परीक्षा टाऊन हॉल मध्ये झाली. त्यात ४ परीक्षेस पास झाले . त्याबद्दल १मे १८६२ रोजी रा.महादेव गोविंद रानडे , रा. गोपालकृष्ण भांडारकर , रा. बाळा मंगेश वागळे व रा. वामन आबाजी मोडक यां विद्यार्थ्यांचा तेव्हाचा पहिला पदवी दान समारंभ नानांच्या हजेरीत पार पडला . हे चोघे ही विद्यार्थी महाराष्ट्रीयन.
📋नानांनी मुंबई विद्यापीठातर्फे १८६६ सालापासून जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची समजली जाणारी शिष्यवृत्ती सुरू केली ती आजतागायत सुरू आहे.
📋विद्यार्थ्यांकरिता नानां नी स्वतःच्या वाड्यात छात्रालय सुरू केले होते त्यात छात्रवृत्ती स्वीकारलेले बाळशास्री जांभेकर हे एक होते .
📋नानांनी १८२६ साली "ज्यूरी"त बसण्याचा एतद्देशीयांचा हक्क प्राप्त केला.
भारतात कायदेशिक्षणाची जी सुरुवात झाली ती मुंबई च्या Law College मधून ज्याच्या उभारणेपाठी ही नाना शंकर शेठ हेंच होते.
३जुलै १८५५ साली एल्फिस्टन कॉलेज च्या एक प्रशस्त सभागृहात कायदेएशिक्षण वर्गाचे उदघाटन झाले .
त्या काळात विलायतेहून बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण झालेलाच वकिली करू शकत होता त्याची फी देखील जास्त असे . नानांनी एतद्देदेशीय वकिलांना कोर्टात वकिली करता येत नाही हा मुद्दा ब्रिटिशांसमोर उठवला . त्या संदर्भातील नानांच्या प्रयत्नाने १८६० साली कायदा पास झाला .
१४ एप्रिल १८६० च्या सरकारी ठराव नुसार एतद्देशीय वकिलांस व्यवसाय करण्याची परवानगी प्राप्त झाली.
📋स्त्री शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केल्या. घरातील मुली ही त्यांनी त्याकरिता त्याच शाळेत शिकायला पाठविल्या . पुढे स्त्री शिक्षण प्रोत्साहनार्थ प्रबोधन करणाऱ्याना वेळोवेळी जमिनी आणि देणग्या नानांकडून दिल्या जात असत. ज्योतिबारावजी फुले यांच्या शिक्षणाबाबतच्या चळवळीला ही त्यांनी अशाप्रकारे हातभार लावला होता . परंतु ही माहिती कोणाला तितकी ज्ञात नाही.
📋जून १८१९ साली माउंट स्टुअर्ट एलफिस्टन याने मुंबईचे पहिले गव्हर्नर पद स्वीकारले
या एल्फिस्टन ने काही इंग्रज व हिंद मंडळी जवळ केली होती तीत नाना शंकर शेठ हे वयाने सर्वात लहान होते . पण लोक कल्याणासाठीची कार्यातील तळमळ , धडाडी , सचोटी पाहून नाना वर एल्फिस्टन चा विश्वास बसला होता . जगन्नाथ शंकरशेठ या तरुणाच्या व शेठ फ्रामजी कासवजी, जमशेदजी टाटा आणि इतर काही प्रौढांच्या सहकार्याने त्याने २१ ऑगस्ट १९२२ रोजी "नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी " विद्यमाने "हिंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळी " नावाची शाळा काढली ही घटना या देशातील शिक्षणाची मुहूर्तमेढ आहे . हे एत्तद्देशीयांसाठी पहिले विद्यालय आहे म्हणून या घटनेचे महत्व सर्वाधिक गणले जाते . पुढील ज्ञान वटवृक्षाचे हे बीजारोपण आहे. या शाळेतील पहिले शिक्षक "सदाशिव काशीनाथ छत्रे" हे होते. 
"दर्पण" वर्तमानपत्रपत्राचे प्रणेते बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर व ख्यातनाम व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर पुढे याच शाळेतून शिकेले होते.
📋पीडित , गरीब लोकांसाठी ही नानांनी शाळा उभारल्या होत्या व त्याचा खर्च नाना स्वतः करत. मुंबई चौपाटी नजीक
नानांनी कोळी लोकांसाठी ही स्वतंत्र शाळा काढल्याचे इतिहास सांगतो . 
१८४६-४७ दरम्यान नानांनी पुन्हा महाराष्ट्र दौरा केला व बहुजन, पीडित , वंचित लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटविले , ज्यांना शिकण्याचे अधिकार दिले जात नव्हते त्यांना ही शाळा काढून त्यात मुले पाठवण्यास प्रोत्साहन दिले . त्यासंदर्भात नानांना तत्कालीन हिंदू कट्टर धर्ममार्तंडांच्या विरोधालाही सामोरे जावे लागले होते.
निरनिराळ्या साप्ताहिकातून , लेखातून "नाना धर्म बुडवितात , क्षुद्र वगैरे सरसकट सर्वांना शिकवितात, शाळेत घेतात " अश्या टीका होऊ लागल्या . परन्तु नानांनी त्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले व शिक्षणप्रसाराचे आपले कार्य सतत चालू ठेवले .
📋एल्फिस्टन कॉलेज :
एलफिस्टन निवृत्तीच्या वेळी म्हणतात:"आम्ही शाळा काढली होती तरी शाळेला विद्यार्थी मिळेनात . नानां नी
घरोघर हिंडून, शिक्षणाचे महत्व पटवून व त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना मुले शाळेत पाठवण्यास आकर्षित केले .
📋पुढे नानांनी "एल्फिस्टन फंड " अशी योजना जाहीर करून लवकरच या फंडातून "एल्फिस्टन कॉलेज " काढण्याचे जाहीर केले . युरोपातील भाषा वांङ्मय , भोतिक शास्त्रे , व इतर कला शिकवणारे पारंगत प्राध्यापक मिळवून देण्याची विनंती नानांनी सरकारला केली . १८३३ सालापासून एल्फिस्टन कॉलेज सुरु झाले .
देश कल्याण हाच हेतू बाळगून वागणाऱ्या व स्वातंत्र्य संपादन करण्याचा दृढ निश्चय करणार्यांपाससून ते समाजसुधारणा करणाऱ्यांसाठी झटणाऱ्या देश सेवकांच्या पहिल्या तीन ही आघाड्या नाना च्या या कॉलेज मधीलच होत्या .
"आचार्य बाळशात्री जांभेकर , दादाभाई नौरोजी , गुरुवर्य रा.गो. भांडारकर , न्यायमूर्ती म.गो.रानडे, का. त्र्यं. तेलंग , सर फिरोज शहा मेहता , लोकमान्य बाळ .गंगांधार टिळक, गोपाळ कृष्ण गोखले , चिंतामणराव देशमुख (सी.डी.) यासारखी नर रत्ने
या शिक्षण संस्थेतूनच शिकुन बाहेर पडली .
📋नाना शंकरशेठ काऊंसिलमध्ये असतानाच १८६४ साली मुंबई शहरातील जनतेला पायाभूत सुविधांबरोबर आरोग्य-सुखसोयी मिळवण्यासाठी मुंबईसाठी स्वतंत्र म्युनिसपल आयोग नेमला. त्याचे पुढे मुंबई म्युनिसिपल कॉपरेरेशनमध्ये रूपांतर केले गेले. आज मुंबई महानगरपालिकेचा जो भव्य-दिव्य वटवृक्षाचा डोलारा वाढला ते रोपटे नानांनी लावले होते.
आणि आज महानगर पालिकेलाच त्यांच्या स्मारकासाठी त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ इतके वर्ष साधा भूखंड ही मिळू शकला नाही (अगदी २०१४ साल पर्यंत) हे दुर्दैव .
📋 नानांनी इंग्रजांच्या सत्तेचा वापर करून व राजा राममोहन रॉय यांच्या साहाय्याने बालविवाह, सती या रुढी समाजाला किती घातक आहेत, हे ठिकठिकाणी व्याख्याने देऊन पटवून देण्याचे काम केले. अंधश्रद्धा आणि ताठर धार्मिक चालीरितींवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली. या चालीरितींमुळे समाजाचे होत असलेले नुकसान त्यांनी समाजाच्या निदर्शनाला आणून दिले. याची दखल इंग्रजी राजवटीने घेऊन १८३०मध्ये इंग्रजांनी अंधश्रद्धेबरोबर जुन्या रुढींना आळा घालण्यासाठी सतीची चाल, बालविवाह या चाली कायद्याने बंद केल्या. तसेच विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी कायद्याने संरक्षण दिले. अशा तर्‍हेने बालविवाह, सतीची चाल या हिंदू धर्मातील अनिष्ट रुढींवर बंदी आणण्यात नानांचा मोलाचा वाटा होता. सती चाली विरोधी जे विधेयक मंजूर झाले ते अंमलात आणण्याच्या मंजुरीवर २ भारतीयांच्या सह्या होत्या त्यात एक राजा राम मोहन रॉय आणि दुसरे नाना शंकर शेठ हे होत .
📋एकशेसाठ वर्षापूर्वी सामान्य माणसाला लांब पल्ल्याचा प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडय़ातून प्रवास करावा लागत असे; ही;खडतर बाब ओळखून नानांनी स्वत: १८४३ साली आगगाडीची कल्पना प्रगतीपथावर नेणार्‍या ध्यासापायी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना केली. डबे आणि लोहमार्गांसाठीचे भांडवल , निधी , ब्रिटीश सरकारशी वाटाघाटी अशा बऱ्याच बाबींत नानांनी श्रम केले आहेत . या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडय़ात होते. प्रकल्पाला स्वतः पुन्हा वेगळ्या देणग्या आणि इतरांकडून ही देणग्या उपलब्ध करून दिल्या . शेवटी नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ या दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. या उद्घघाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुण्यांचा व त्यामधुन प्रवास करण्याचा मान हा इंग्रजांनी नानांना दिलाच, पण त्याशिवाय प्रथम वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्यांचा सन्मान देखील केला. तेव्हापासूनच नाना शंकरशेठ यांना “भारतीय रेल्वेचे जनक” म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नानां शंकरशेठांचा पुतळा त्यांची साक्ष देतो.
आपण सर्वसाधारणपणे समजतो की रेल्वे आणली भारतात ती ब्रिटिशांनी परंतु तसे नसून त्यापाठचे श्रेय हे या भारतीय महापुरुषाचेच होते .
📋पूर्वजांप्रमाणे भटभिक्षुकी न करता नानांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. त्यामुळे अनेक अरब, अफगाण तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेठ यांच्याकडे सोपवत. एवढा त्यांच्यावर विश्वास असे.
📋पाऊस पडो ना पडो , पीक येवो ना येवो ब्रिटिश सरकार शेतकऱ्यांकडून सक्तीने महसुल वसूल करत असे. त्या विरोधात नानांनी कायदेमंडळात आवाज उठवला .
व्यापारी शेतकऱ्यांकडून अल्प दरात पीक विकत घेईत आणि साठेबाजी करून कृत्रिम दुष्काळ निर्माण करीत . परिणामी नंतर शेतकऱ्यांना त्यांनीच पिकवलेले धान्य महागात विकत घेण्याची पाळी येत असे. त्यासाठी तत्कालीन स्थितीवर उपाय म्हणून नानांनी "जॉईंट स्टॉक कंपनी" ची स्थापना करून शेतकाऱ्यांकडून ही कंपनी पीक विकत घेई आणि ना नफा ना तोटा तत्वावर पुन्हा ज्यांचे त्यांना मात्र स्वस्त दरात विके . यामुळे व्यापारी वर्गाच्या पिळवणुकीतून होणाऱ्यां तोट्यापासून शेतकर्यांची सुटका होत असे.
📋१८४३ साली आचार्य बाळशास्त्री जांभेकर नानाकडे आले . त्यांना बाटून ख्रिश्चन झालेल्यांचे शुद्धीकरण करायचे होते . नानांनी अशा शुद्धीकरणासाठी नुसतीच मदत केली नाहीतर शुद्धीकरणात पुढाकार घेतला.
श्रीपतशेषाद्रिचे शुद्धीकरण प्रकरण त्याकाळी फार गाजले .
मिशनऱ्यांनी नानांवर फार टीका केली . परंतु योग्य व गरज पडेल तिथे नानांनी हिंदू , वैदिक सनातन धर्माचीही बाजू पुढाकाराने उचलून धरली . हिंदू धर्मातील मुलाला त्याचा धर्म सोडायला लावून ख्रिश्चन धर्मात आणणे कायद्याने गुन्हा आहे .
तसेच तो स्वेच्छेने कोणे एका धर्मात येत असेल तर त्याला तसे येऊ न देणे हा ही गुन्हा होईल अशा ठाम भूमिकेने त्यांनी अशासारख्या धार्मिक नाजूक प्रकरणात ही स्वेच्छेने यशस्वी लढा दिला .
नाना प्रमाणे बाळशास्त्री जांभेकरांनाही या प्रकरणात फार विरोध सहन करावा लागला होता .
📋शेती संबंधीतील विविध बियाणांच्या शेतीचे प्रयोग , पाण्याच्या साठ्याचे तलाव बांधणे, धर्मार्थ दवाखाना बांधणे, प्रसूतीगृहांची उभारणी करून देणें, नाट्यगृह, वस्तू संग्रहालये , उद्याने उभारणे यातही नांना अग्रेसर होते .
नानांच्या नेतृत्वाखाली प्रिन्स अल्बर्ट म्युझियम, आताचे भाऊ दाजी लाड म्युझियम, व्हिक्टोरिया गार्डन (राणीचा बाग) यांची निर्मिती झाली. राणीच्या बागेला नानांची बाग असे नाव द्यावे, असा प्रस्ताव असूनही, नानांनी त्यास व्हिक्टोरिया राणीचे नाव द्यावयास लावले.
📋नानांनी देशात व मुंबईत पहिले सार्वजनिक धर्मार्थ दवाखाने व सुतिकागृहे सुरू केली.
📋 स्टीम नॅव्हिगेशन कंपनी स्थापून कोकण ते कारवार जल वाहतूक सुरू केली.
📋 नाना बँकांचे संस्थापक होते. बँक ऑफ वेस्टर्न इंडिया, बँक ऑफ बॉम्बे, गव्हर्मेंट सेव्हिंग बँक, जी बँक सन १८४५ पासून ओेरिएंटल बँक म्हणून ओळखली जाऊ लागली. मर्कंटाइल बँक ऑफ इंडियाच्या चीन व लंडन येथील शाखांच्या कमिटीवर नानांना घेण्यात आले होते.
📋 १८५१ साली लंडनमध्ये तसेच १८५३ साली पॅरिसमध्ये भरलेल्या जागतिक उद्योग प्रदर्शनात हिंदुस्थानातून काय पाठवावे, यावर नानांचा सल्ला घेण्यात आला. 
📋त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांना गव्हर्नरने ‘जस्टिस ऑफ पीस’ हे पद बहाल केले होते.
📋अशा आणि तत्सम सर्व क्षेत्रातील त्यांच्या कार्याच्या उदाहारणांवरून त्यांचे जीवन कार्य हे तत्कालीन समाजव्यवस्थेच्या सुधारणा हेतू करीताच होते , एखाद्या मुंबई नगरीच्याच काय त्या विकासाला समोर धरून नव्हते हे लक्षात येईल. जरी त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे मुंबई शहराच्या विकासकार्यास झाला . त्यातूनच अशा या पुण्यश्लोक जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना आधुनिक मुंबईचा शिल्पकार मानण्यात आले .
©
योगेश वेदक

Comments